(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी सोमवारी (२२ सप्टेंबर) मिरकरवाडा जेट्टीला भेट देत थेट मच्छीमार बांधवांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान स्थानिक मच्छीमार व नेपाळी खलाश्यांची माहिती घेण्यात आली तसेच किनाऱ्यावर असणाऱ्या सुरक्षाव्यवस्थांचा आढावा घेऊन बोटींची तपासणीही करण्यात आली.
या वेळी बगाटे यांनी स्वतः नौका विभागातील जवानांसोबत सागरी गस्त करत किनारपट्टीची पाहणी केली. “किनारपट्टीवरील अवैध हालचालींवर आळा घालण्यासाठी पोलीस दल व स्थानिक मच्छीमार यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. समुद्रात कुठलीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास कळवावे,” असे आवाहन त्यांनी मच्छीमारांना केले.
भेटीदरम्यान अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राधिका फडके, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक पाटील, जिल्हा सुरक्षा शाखेचे निरीक्षक नितीन भोईर तसेच नौका विभागातील अंमलदार उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे किनारपट्टी सुरक्षेसाठी स्थानिक स्तरावर विश्वासाचे नवे बंध दृढ होणार असल्याची भावना मच्छीमार बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.

