(रत्नागिरी)
मुलींमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळावे यासाठी 14 वर्षे वयोगटातील मुलींना एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लस देण्यात येत आहे. या लसीबाबत समाजमाध्यमांवर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता पालकांनी आपल्या मुलींना लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेच्या टास्क फोर्स समितीची बैठक आज जिल्हा परिषदेच्या दालनात पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. व्ही. व्ही. बिराजदार, जिल्हा बाह्य संपर्क अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट आदी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यासाठी एकूण 10 हजार 600 एचपीव्ही लसी प्राप्त झाल्या असून सुमारे 9 हजार 859 मुली लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना 30 टक्के लसींचे वितरण करण्यात आले आहे. तसेच सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
लसीकरण म्हणजे कॅन्सरपासून संरक्षणाचे कवच
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या की, एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ 8 मार्च रोजी झाला असून रत्नागिरी जिल्ह्यात 9 मार्चपासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ऑक्टोबर 2025 मध्ये 9 ते 14 वयोगटातील सुमारे 10 हजार मुलींना ही लस देण्यात आली होती.
लस घेतलेल्या कोणत्याही मुलीमध्ये साइड इफेक्ट, ॲलर्जी किंवा इतर कोणतीही गंभीर लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या नकारात्मक संदेशांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सध्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एचपीव्ही लस हे प्रभावी संरक्षण कवच ठरू शकते. बाजारात ही लस महाग असून तिचा तुटवडाही आहे. मात्र शासनाकडून ही लस मोफत दिली जात असल्याने अधिकाधिक मुलींनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
या परिस्थितीत लस घेऊ नये
👉 मध्यम किंवा तीव्र आजार असलेल्या मुलींना पूर्णपणे बरे होईपर्यंत लस देऊ नये.
👉 मागील लसीकरणामुळे ॲलर्जीक प्रतिक्रिया आलेल्या मुलींना लस देऊ नये.
👉 यीस्टची ॲलर्जी असलेल्या मुलींनी लस घेऊ नये.
👉 गर्भावस्थेत लसीकरण टाळावे.
👉 अपेक्षित वयोगटाबाहेरील मुलींना लस देण्यात येणार नाही.
👉 ज्या मुलींनी यापूर्वी एचपीव्ही लसीचा एक किंवा अधिक डोस घेतला असेल, त्यांना मोहिमेदरम्यान पुन्हा लस दिली जाणार नाही. त्यांच्या लसीकरणाची नोंद यू-वीन पोर्टलवर अद्ययावत केली जाईल.
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारापासून भविष्यात संरक्षण मिळवण्यासाठी पालकांनी अधिकृत शासकीय सूचनांवर विश्वास ठेवून लसीकरण मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

