(चिपळूण)
तालुक्यातील सावर्डे, अबीटगाव आणि वहाळ परिसरातील रस्त्यांची कामे मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देत तात्काळ काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि अवघ्या २४ तासांत रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे–अबीटगाव–मूर्तवडे–तवसाळ तसेच सावर्डे–वारेली–तोंडली–पिलवली आणि वहाळ–शिरंबे–विरबंदर या रस्त्यांची कामे शासनाच्या नॉन-प्लॅन आणि एमसी योजनेतून मंजूर झाली आहेत. या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्यक्ष काम सुरू झाले नव्हते. परिणामी या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून वाहतूक करणे नागरिकांसाठी कठीण झाले होते.
ग्रामीण भागातील हे महत्त्वाचे मार्ग असल्याने स्थानिकांच्या दळणवळणावर त्याचा मोठा परिणाम होत होता. विशेषतः पावसाळा जवळ आल्याने रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत तर वाहतूक ठप्प होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी या विषयाची गंभीर दखल घेत थेट प्रशासनाशी संपर्क साधला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्र देत संबंधित रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत आणि पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कामे सुरू न झाल्यास ग्रामस्थांसह आंदोलन करण्याची तयारीही दर्शवली होती.
या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत अवघ्या २४ तासांत सावर्डे–अबीटगाव–मूर्तवडे मार्गाच्या कामाला सुरुवात केली. याची माहिती मिळताच सौ. शिवानी सावंत व संदीप सावंत यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. काम दर्जेदार व उत्कृष्ट पद्धतीने व्हावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच उर्वरित दोन रस्त्यांची कामेही लवकरात लवकर सुरू करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

