(खेड )
तालुक्यातील एका तरुणीच्या नावाने फेक इन्स्टाग्राम आयडी तयार करून तिचे अश्लील फोटो आणि संदेश तिच्या होणाऱ्या पतीला पाठवणाऱ्या चिपळूणमधील तेजस सदानंद पवार (वय ३०, रा. अनारी-गणेशवाडी, चिपळूण) याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करत धमकीही दिली होती. ही घटना एप्रिल २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत घडली.
तक्रारीनुसार, आरोपी तेजस पवार याने पीडितेच्या नावाचा बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार केला. या आयडीवरून त्याने अश्लील संदेश व फोटो प्रसारित केले. “तुला काय करायचं ते कर, आपल्यात पूर्वी रिलेशन होतं,” असे म्हणत तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याशिवाय, पीडितेच्या होणाऱ्या पतीच्या मोबाईलवर देखील हे फोटो व मेसेज पाठवले गेले.
या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावी लागलेल्या पीडित तरुणीने अखेर रविवारी सायंकाळी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर रात्री उशिरा तेजस पवार याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला व सोमवारी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भोयर करत असून, तपासकार्य पोलीस उपविभागीय अधिकारी भागुजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.