(रत्नागिरी / वार्ताहर)
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ (अ)मधून शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करताच सौरभ मलुष्टे यांच्या नावाची चर्चा शहरात सुरु झाली आहे. नेहमीच्या राजकारणी पद्धतीला फाटा देत, जनतेला थेट भिडणारा आणि अत्यंत प्रामाणिक संदेश असलेले या तरुण उमेदवाराचे प्रचार पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. “पैसे कष्टाने कमवीन… ‘मत’ काम करून मिळवीन!” अशी स्पष्ट व नैतिक भूमिका मांडणारे हे पोस्टर स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा संदेश देणारे ठरले आहे.
निवडणूक म्हटली की पैसा, जात, गटबाजी, दमबाजी आणि नेहमीचीच आश्वासने यांचा खेळ आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो. मात्र या सर्व परंपरेपासून वेगळी दिशा दाखवणारे, जनसामान्यांच्या अंत:करणाला भिडणारे आणि राजकारणामध्ये नवा आदर्श निर्माण करणारे सौरभ मलुष्टेंचे पोस्टर नागरिकांच्या चर्चेचा विषय बनले आहे.
युवा उद्योजक आणि निस्वार्थ सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या सौरभ मलुष्टे यांनी मागील अनेक वर्षांत कोणाचेही पाठबळ अथवा कसलीही अपेक्षा न ठेवता सामाजिक क्षेत्रात दिशादर्शक काम केले आहे. गरजूंना मदत पोहोचवण्यापासून ते वैद्यकीय उपचार, सामाजिक उपक्रम तसेच तरुणांना रोजगारासाठी मार्गदर्शन करत निस्वार्थीपणे आपले कर्तव्य पार पाडले आहे. यामुळे पहिल्यांदा निवडणुकीच्या रणांगणात उतरतानाच त्यांची प्रतिमा ‘सतत लोकांसाठी उपलब्ध असणारा आणि प्रामाणिकपणे काम करणारा तरुण’ अशीच निर्माण झाली आहे.
नगरसेवक झाल्यावर प्रभागातील प्रत्येक रुपया पारदर्शकपणे, नियोजनबद्ध पद्धतीने आणि उपयुक्त विकासकामांसाठीच खर्च केला जाईल, अशी हमी मलुष्टे यांनी दिली आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जबाबदारी या तीन तत्वांवर आधारित त्यांची निवडणूक मोहीम प्रभाग ५ मध्ये स्वच्छ राजकारणाचा नवा पॅटर्न निर्माण करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
सौरभ मलुष्टे यांच्या आजवरच्या व्यापक सामाजिक कार्यामुळे आणि प्रत्येक नागरिकाशी असलेल्या अतूट जवळीकीमुळे प्रभाग क्रमांक ५ मध्ये २४ तास ३६५ दिवस खऱ्या अर्थाने काम करणारा, तळागाळापर्यंत धावून येणारा, आणि लोकांचे प्रश्न तातडीने आणि जबाबदारीने सोडवणारा हक्काचा लोकप्रतिनिधी मिळणार आहे.
एकीकडे निवडणुकांमध्ये ‘पैसा’ निर्णायक ठरतो अशी धारणा समाजात रुजलेली असताना, दुसरीकडे “कष्टाने पैसे, कामातून मते” अशी थेट आणि ठाम भूमिका घेणारा उमेदवार उभा राहिल्यामुळे प्रभाग ५ मध्ये स्वच्छ, प्रामाणिक आणि सकारात्मक राजकारणाचा एक नवा प्रवाह सुरू होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे.

