(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे फक्त वाहतुकीसाठी अडथळा ठरत नाहीत, तर नागरिकांच्या आरोग्यासाठीही गंभीर धोका बनले आहेत. लोकप्रतिनिधींची उदासिनता, स्थानिक प्रशासनाची निष्क्रियता आणि ठेकेदारांचा भ्रष्ट कारभार यामुळे हे खड्डे कायमस्वरूपी केव्हाच दुरुस्त केले जात नाहीत. खड्ड्यांच्या जीवावरच अनेकांचे संसार चालले असल्याने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यांवरील हे खड्डे सध्या नागरिकांना एक अनोख्या ‘खड्डा थेरपी’ चा अनुभव देत आहेत. मोफत पाठ, कंबर आणि गुडघ्याचे व्यायाम, ज्यामुळे लवकरच म्हातारपणाचा अनुभव येतो, आणि जीवनातील आपल्या कठीण परिस्थितीची जाणीव होते, अशी उपरोधिक टीका नागरिक सध्या करत आहेत.
आजच्या महागाईच्या काळात आरोग्यसेवेचे दर गगनाला भिडले आहेत; परंतु स्थानिक प्रशासनाने ‘खड्डा थेरपी’द्वारे नागरिकांचे व्यायाम शुल्क वाचवण्याचे काम सुरू केले आहे. रस्त्यावर जागोजागी बसणारे धक्के पाठीच्या, कंबरच्या आणि मणक्याच्या आजारांशी थेट जोडले जात आहेत. परिणामी औषधोपचार, फिजिओथेरपी आणि कधीकधी मोठ्या शस्त्रक्रियेचीही गरज निर्माण होत आहे. मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींना याचे कोणतेच सोयरसुतक वाटत नाही. कायम एसी गाड्यांमधून फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी दुचाकीवरून संपूर्ण शहरात एकवेळ फेरफटका मारावा आणि लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
या रस्त्यांनी दुचाकी वाहन चालवणे म्हणजे तारेवरची मोठी कसरतच बनली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणाम गाडी थेट खड्ड्यामध्ये जाते आणि जोरात धडकते. यामध्ये वाहन चालकाचे आणि जवळच्या पादचाऱ्यांचे कपडेही चिखलाने माखले जातात. रस्त्यावरील खड्यांमुळे वाहनाचे देखील मोठे नुकसान होत आहे. बऱ्याच वेळा गाड्या या खड्ड्यांमध्ये अडकून पडतात. अशा खड्ड्यांमुळे तरुणांना लवकरच गुडघेदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखीचा अनुभव मिळत आहे. प्रशासनाच्या या उपकारांमुळे ‘तरुण’ आणि ‘म्हातारे’ यांच्यातील फरक मिटत असल्याचेही उपरोधिकपणे सांगितले जाते.
स्थानिक प्रशासन अनेकदा खड्डे बुजवण्याच्या मोहिमांचा उल्लेख करत असले तरी, निकृष्ट दर्ज्यामुळे काम फक्त कागदोपत्रीच राहते. अनेक ठिकाणी माती, दगड किंवा तात्पुरते डांबर टाकले जाते, जे एका पावसातच वाहून जाते. रस्त्यांच्या साईडपट्टीचा तर पत्ताच नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधीं विरोधात संताप वाढत आहे. लोकांच्या आरोग्याची, जीवाची पर्वा न करता प्रशासन फक्त कर्तव्यपूर्तीचा देखावा करत असल्याचा आरोप केला जात आहे.
लोकप्रतिनिधी फक्त उद्घाटन समारंभ आणि राजकारणात व्यस्त आहेत, खड्ड्यांच्या समस्येकडे मात्र डोळसपणे दुर्लक्ष केले जाते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ही “रस्ते थेरपी” तात्पुरती ‘थातुरमातुर’ पद्धतीने झाकली जाईल, मात्र वास्तवात नागरिकांचे आरोग्य आणि जीवन आहे तसेच राहणार आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकांच्या काळात नागरिकांचा हा रोष आणि असंतोष उफाळून येऊ शकतो, अशी स्थिती आता शहरात निर्माण झाली आहे.

