(राजापूर / तुषार पाचलकर)
वडिलोपार्जित घराच्या वादातून पुतण्याने काकाला मारहाण केल्याची घटना परूळे (जुवेवाडी) येथे घडली. याप्रकरणी श्याम मुरलीधर सावंत (वय ५८, रा. परूळे, जुवेवाडी, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दीपक श्रीराम सावंत व अन्य तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम सावंत आणि दीपक सावंत हे नात्याने काका-पुतणे असून त्यांच्यात वडिलोपार्जित घरावरून वाद सुरू आहे. या प्रकरणी न्यायालयात खटला देखील सुरू आहे. दि. ८ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास श्याम सावंत हे त्यांची पत्नी संगीता सावंत आणि लहान भाऊ सुदाम यांच्यासह परूळे येथील मूळ घरी आले होते. त्या वेळी दीपक सावंत व अन्य तीन महिलांनी सामाईक घराच्या वादाचा राग मनात धरून त्यांच्यावर धावून येत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी दीपक सावंत याने स्टीलच्या बाटलीने श्याम सावंत यांच्या डाव्या गालावर मारून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ११८ (१), ३५२, ३५१ (१), ३५१ (२) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

