(दापोली / वार्ताहर)
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरील नांगलवाडी फाट्याजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दापोली येथील दानिश पालटे (वय अंदाजे ३२ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे दापोली शहरासह ग्रामीण भागात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दानिश पालटे हे आपल्या दुचाकीवरून दापोली येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. महाड तालुक्यातील नांगलवाडी फाट्याजवळ आले असता, समोरून भरधाव येणाऱ्या स्कोडा कारची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर कारचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने दानिश पालटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दानिश पालटे हे मूळचे दापोली तालुक्यातील आडे गावचे रहिवासी होते. सध्या ते दापोलीतील काळकाई कोड, हिल टॉप परिसरात वास्तव्यास होते. मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना झालेल्या या अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीय आणि परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनमिळाऊ स्वभावाच्या या तरुणाच्या मृत्यूची बातमी समजताच दापोली शहर आणि ग्रामीण भागातून शोक व्यक्त केला जात आहे.
दानिश पालटे यांच्या पश्चात दोन मोठे भाऊ, एक मोठी बहीण, आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.


