(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे गेट विनापरवाना बंद केल्यामुळे कालवा ओव्हरफ्लो होऊन नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचल येथील सुभाष काळे याच्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अमोल बनसोडे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास संशयित सुभाष काळे यांनी कोणतीही परवानगी न घेता अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे गेट बंद केले.
यामुळे कालव्यातील पाण्याचा दाब वाढून कालवा ओव्हरफ्लो झाला आणि भरावाच्या ठिकाणी फुटला. परिणामी पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पाचल धनगरवाडी येथे जाणारा सुमारे १०० मीटर लांबीचा डांबरी रस्ता तसेच काही शेतजमीन वाहून गेली.
या घटनेत जलसंपदा विभागाचे अंदाजे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुभाष काळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

