(खेड – रत्नागिरी / प्रतिनिधी)
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील जखमी कामगारांपैकी एका कामगाराचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून उर्वरित जखमी कामगारांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या डॉ. खान केमिकल कंपनीत दि. ६ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात एकूण ११ कामगार जखमी झाले होते. त्यापैकी सहा कामगार गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने नवी मुंबईतील ऐरोली येथे असलेल्या नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी हलविण्यात आले आहे.
याच रुग्णालयात उपचार सुरू असताना ६५ टक्क्यांहून अधिक भाजलेले रघुनाथ खंडू खामकर (वय ५७, रा. मुरडे, ता. खेड) यांचा मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आली. दरम्यान, उर्वरित जखमी कामगारांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांच्या कुटुंबीयांमध्ये अद्यापही मोठी चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, या स्फोटाचे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. घटनेनंतर पुणे येथील ऑडिट संस्थेकडून तपासणी करण्यात आली असली तरी त्यांचा अंतिम अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. पुढील दोन दिवसांत हा अहवाल येण्याची शक्यता असून त्यातून स्फोटामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या नियमांचे काटेकोर पालन झाले होते का, आपत्कालीन व्यवस्थापन कितपत सक्षम होते, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष झाले का, असा सवालही स्थानिक स्तरावर उपस्थित केला जात आहे.
तसेच कोल्हापूर येथील कंपनी सुरक्षा निरीक्षक बुधवारी पुन्हा एकदा घटनास्थळी तपासणीसाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या तपासणीतून स्फोटामागील सत्य समोर येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या दुर्घटनेने औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्थेच्या वास्तवावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा
डॉ. खान इंडस्ट्रियल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीचे मालक डॉ. विखार अहमद खान, मॅनेजर सलीम अब्दुल वासे बिजापुरे, प्लांट इंचार्ज प्रीतम बाळकृष्ण पोळेकर तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये ७ मार्च रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घातक रसायनांशी संबंधित काम सुरू असतानाही कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने न पुरविणे आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

