(राजापूर /रत्नागिरी)
ओणी हायस्कूलसमोरील साई विमलेश्वर हॉल परिसरात उभी केलेली हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुचाकीची किंमत सुमारे २० हजार रुपये असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संदीप दिनकर निचिते (वय ४४, मूळ रा. निचिते गल्ली, सोळांकूर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर; सध्या रा. साई विमलेश्वर हॉल, ओणी हायस्कूलसमोर, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. ते राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निचिते यांची २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत दुचाकी चोरीला गेली. शनिवारी साप्ताहिक सुट्टी असतानाही कार्यालयीन कामानिमित्त ते २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.४५ वाजता घराबाहेर पडले. त्यावेळी ओणी हायस्कूलसमोर उभी केलेली त्यांची दुचाकी जागेवर दिसून आली नाही.
दुचाकीचा शोध घेण्यासाठी त्यांनी ओणीचे पोलीस पाटील संजय लिंगायत तसेच कोडवाडी येथे राहणारे मित्र नामदेव नडे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मित्र संग्राम नामदेव भावके यांच्यासोबत ओणी परिसर, पाचल फाटा आणि ओणी बाजारपेठेत दुचाकीचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. काळ्या रंगाच्या या हिरो स्प्लेंडर प्लस डीआरएस दुचाकीच्या बाजूला निळ्या आणि लाल रंगाचे पट्टे असून, तिचा नोंदणी क्रमांक MH-09-GH-5103 असा आहे. अज्ञात व्यक्तीने मालकाच्या संमतीशिवाय आर्थिक फायद्याच्या उद्देशाने दुचाकी चोरून नेल्याची फिर्याद देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.


