(राजापूर)
राजापूर शहरातील प्रथितयश उद्योजक, हॅपी होम बोअरवेलचे मालक आणि राजापूर अर्बन बँकेचे संचालक श्री. प्रकाश कातकर यांचे आज सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण राजापूर शहरावर शोककळा पसरली आहे.
श्री. कातकर यांची राजापूर तालुक्यात कुणबी समाजाचे आधारस्तंभ म्हणून ओळख होती. विविध संघटनांच्या माध्यमातून ते नेहमीच समाजसेवेत अग्रेसर होते. शनिवारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रारंभी रत्नागिरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाने राजापूर तालुक्याचे मोठे नुकसान झाले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज दुपारनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.