(पुणे)
पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधित गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याची प्राथमिक माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा मार्गावर खेड-शिवापूर येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. माहितीनुसार, या गाडीत पोलिसांना जवळपास 5 कोटींची रोख रक्कम मिळाली असल्याचे समजते. पोलिसांनी सदर गाडी ताब्यात घेतली आहे. सध्या खेड-शिवापूर पोलिस चौकीत वरिष्ठ पोलिस आणि महसूल अधिकारी दाखल झाले होते. दरम्यान, शहाजी नलावडे असे गाडीतून ताब्यात घेतलेल्या एका व्यक्तीचे नाव आहे. तो महायुती सरकारमधील बड्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. पोलिसांनी गाडी आणि काही व्यक्तींना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर रोख रक्कम घेऊन जाणारे वाहन राजगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले.