( बदलापूर / वृत्तसंस्था )
आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातून स्त्री-बीज काढण्याचा आणि त्यांची विक्री करण्याचा कथित प्रकार बदलापूरमध्ये उघडकीस आला आहे. या रॅकेटच्या माध्यमातून ४० हून अधिक महिलांचे शोषण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यातील एका महिलेच्या शरीरातून तब्बल ३३ वेळा स्त्री-बीज काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी बदलापूर आणि आसपासच्या परिसरात छापे टाकत कारवाई केली.
या प्रकरणाचा पहिल्यांदा ठाणे पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात पर्दाफाश केला होता. त्यावेळी सुलक्षणा गाडेकर या स्थानिक महिलेसह तीन महिलांना अटक करण्यात आली होती. तपासानुसार, या कथित रॅकेटचे संचालन बदलापूरमधून केले जात होते. सुलक्षणा गाडेकर आपल्या घरातूनच हा बेकायदेशीर व्यवसाय चालवत असल्याचा आरोप आहे. तिच्या घरात ओव्ह्युलेशन-स्टिम्युलेटिंग इंजेक्शन्स साठवून ठेवण्यात आली होती. महिलांना वैद्यकीय देखरेखीशिवाय ही इंजेक्शन्स दिली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
या जाळ्यात प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना लक्ष्य केले जात असल्याचा संशय आहे. एका वेळी २५ हजार ते ३० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून महिलांना या प्रक्रियेसाठी तयार केले जात होते. इंजेक्शन्स दिल्यानंतर त्यांची अनधिकृतपणे सोनोग्राफी केली जात असे. त्यानंतर महिलांना आयव्हीएफ केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये नेले जात होते. तेथे ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांकडून त्यांच्या शरीरातून स्त्री-बीज काढले जात असल्याचा आरोप आहे. या स्त्री-बीजांचा पुढे विक्रीसाठी वापर केला जात असल्याचे तपासात उघड झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे, एका महिलेच्या शरीरातून तब्बल ३३ वेळा स्त्री-बीज काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार अशा प्रकारची प्रक्रिया केल्याने महिलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, पैशांचे आमिष दाखवून महिलांना या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात असल्याचा संशय आहे. योग्य वैद्यकीय देखरेख आणि आवश्यक सुरक्षेचा अभाव असल्यामुळे संबंधित महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ठाणे पोलिसांच्या तपासानंतर आता ईडीने या प्रकरणात लक्ष घातले आहे. या कथित नेटवर्कमध्ये सहभागी असलेले एजंट, मध्यस्थ आणि व्यावसायिक यांच्यातील आर्थिक व्यवहार व परस्परसंबंध तपासले जात आहेत. बदलापूरमधील अनेक नामांकित रुग्णालये आणि आयव्हीएफ केंद्रे तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती आहे. महिलांना या प्रक्रियेसाठी तयार करणाऱ्या एजंटांपासून ते प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांपर्यंत संबंधितांची चौकशी सुरू आहे.


