(सिंधुदूर्ग / प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपहरण करून मारहाण केल्याच्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या विलास संभाजी वसेकर (वय 35, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पुण्यातील मोशी परिसरातून अटक केली. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अटकेनंतर आरोपीला पुढील तपासासाठी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कृष्णा संजय माळी (रा. कुडाळ) यांचे कुडाळ एमआयडीसी परिसरातून अपहरण करण्यात आले होते. त्यांना बलेनो कारमध्ये जबरदस्तीने बसवून गोव्यातील पत्रादेवी येथील हॉटेल व्हिवा गोवा येथे नेण्यात आले. त्यानंतर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांना तेर्सेबांबर्डे येथील हॉटेल साई प्रसाद येथे आणण्यात आले.
या दरम्यान, चार लाख रुपये कधी देणार, अशी विचारणा करत विलास वसेकर याच्यासह पाच ते दहा जणांनी कृष्णा माळी यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी 24 ऑक्टोबर 2024 रोजी कुडाळ पोलीस ठाण्यात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर विलास वसेकर स्वतःची ओळख लपवून राहत असल्याने कुडाळ पोलीस आणि सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान, आरोपी पुण्यातील मोशी येथील कचरा डेपो परिसरात असलेल्या अँथनी लारा रिन्यूएबल एनर्जी कंपनीत काम करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे आणि त्याच्या मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांनी त्याचे ठिकाण निश्चित केले. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, विलास वसेकर याच्याविरुद्ध सोलापूर ग्रामीणमधील बार्शी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 304-ब आणि 354-अ यांसह विविध कलमांनुसार तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


