(मुंबई)
मुंबई विमानतळ सीमा शुल्क आयुक्तालय (Customs Zone-III) च्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थ आणि सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १२.०३१ किलो हायड्रोपोनिक वीड जप्त केले आहे. या कारवाईत जप्त अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे १२.०३ कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बँकॉकहून अमली पदार्थांची तस्करी; ५ जण अटकेत
सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयास्पद हालचाली आणि एपीआयएस (Advanced Passenger Information System) प्रोफाइलिंगच्या आधारे तपासणी करण्यात आली. यावेळी बँकॉकहून आलेल्या पाच प्रवाशांकडून हायड्रोपोनिक वीड तस्करीची चार प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करून पाचही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

सोन्याचीही तस्करी
अमली पदार्थांसोबतच कस्टम्सने सोन्याच्या तस्करीचे तीन प्रयत्नही हाणून पाडले. वेगवेगळ्या तीन प्रकरणांत प्रवाशांकडून ४०९ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे ५९.५७ लाख रुपये आहे. हे सोने बेकायदेशीरपणे लपवून आणले जात होते. या प्रकरणी सीमा शुल्क कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या आणखी एका प्रवाशाला अडवले. त्याच्या झडतीमध्ये ४९९ ग्रॅम हायड्रोपोनिक वीड आढळून आले, ज्याची किंमत सुमारे ४९.९ लाख रुपये आहे. संबंधित प्रवाशाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
मुंबई विमानतळ सीमा शुल्क आयुक्तालय (Customs Zone-III) च्या अधिकाऱ्यांच्या मते, या कारवाईत आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटा अॅनालिटिक्सचा मोठा उपयोग झाला. प्रवाशांची अचूक प्रोफाइलिंग आणि स्पॉट तपासणीमुळे संशयास्पद हालचाली वेळेत ओळखणे शक्य झाले. तस्करी रोखण्यासाठी पुढील काळात अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि तांत्रिक सक्षमीकरण यावर अधिक भर दिला जाणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले.

