(सिंधुदुर्ग / वैशाली खानोलकर)
शासनाच्या पंचायत प्रगती निर्देशांक अंतर्गत स्वच्छ, सुंदर व हरित गाव अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील झाराप ग्रामपंचायत स्वयंमूल्यांकनात महाराष्ट्र राज्यात अव्वल ठरली आहे. हा झाराप गावासाठी मोठा बहुमान आहे. झाराप ग्रामपंचायत आता केंद्रस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्गच्या नावलौकिकात भर पडली आहे.
केंद्रस्तरीय स्पर्धेत झाराप ग्रामपंचायतीची स्पर्धा तेलंगणा व मिझोरम राज्यातील गावांसोबत आहे. दरम्यान, गावाच्या मूल्यांकनासाठी केंद्रस्तरीय टीम पुढील आठवड्यात झाराप गावात येणार आहे. या स्पर्धेसाठी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थ व प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती कुडाळ पं. स. गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर व झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.

