(नवी दिल्ली)
देशात 10, 20 आणि 50 रुपयांच्या लहान मूल्यांच्या नोटांचा तुटवडा असल्याच्या चर्चांना केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे. संसदेत दिलेल्या माहितीनुसार देशात या नोटांची कमतरता नसून नागरिकांना सुट्टे पैसे सहज मिळावेत यासाठी ‘स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर’ एटीएमचा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिली.
राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना पंकज चौधरी यांनी सांगितले की, पारंपरिक एटीएममधून बहुतेक वेळा 100, 500 किंवा त्यापेक्षा मोठ्या मूल्याच्या नोटा मिळतात. त्यामुळे नागरिकांना अनेकदा सुट्ट्या पैशांची अडचण निर्माण होते. ही समस्या लक्षात घेऊन ‘स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर’ नावाच्या विशेष एटीएमद्वारे 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
बाजारात लहान नोटांचा तुटवडा नाही
देशात लहान मूल्यांच्या नोटांची कमतरता असल्याच्या अफवांवर सरकारने स्पष्ट भूमिका मांडली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या माहितीनुसार, बाजारात लहान नोटांचा तुटवडा नाही आणि आवश्यकतेनुसार पुरवठा सातत्याने केला जात आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात (२६ फेब्रुवारीपर्यंत) केंद्रीय बँकेने मोठ्या प्रमाणावर लहान नोटा बाजारात उपलब्ध करून दिल्या आहेत.
- ४३९.४० कोटी – 10 रुपयांच्या नोटा
- १९३.७० कोटी – 20 रुपयांच्या नोटा
- १३०.३० कोटी – 50 रुपयांच्या नोटा
तर मागील आर्थिक वर्षातही मोठ्या प्रमाणावर या नोटांचा पुरवठा करण्यात आला होता.
नोटा आणि नाण्यांद्वारे मागणी पूर्ण
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विविध मूल्यांच्या चलनी नोटांची मागणी सतत तपासत असते आणि आवश्यकतेनुसार नोटांची छपाई करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारसी करते. कमी मूल्याच्या रोख व्यवहारांची मागणी नोटा आणि नाण्यांच्या मिश्रणाद्वारे पूर्ण केली जाते. दरम्यान, देशात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून लहान व्यवहारांसाठीही डिजिटल पद्धतींचा वापर वाढत असल्याचे सरकारने नमूद केले.

