( मुंबई )
मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही तरुणी डेटिंग ॲपच्या माध्यमातून अनोळख्या तरुणांशी मैत्री करून, त्यांना हॉटेलमध्ये बोलावून आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या ६ तरुणींसह एकूण २१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
फसवणुकीचा सिनारिओ ठरवून आखलेला
या टोळीचे काम अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने सुरू होते. आरोपी तरुणी प्रथम डेटिंग अॅपवर मुलांशी संपर्क करत. मैत्री जुळल्यानंतर त्या मुलांना हॉटेलमध्ये भेटण्याचा बहाणा करून बोलावत. मात्र, त्या हॉटेलमध्ये वेटर, स्टाफ, मेन्यू असे सर्व काही आधीच ठरवलेले असायचे. जेव्हा मुलं हॉटेलमध्ये यायची, तेव्हा महागडे पदार्थ, दारू, हुक्का वगैरे ऑर्डर केले जात असे. शेवटी त्यांच्यावर हजारोंचे बिल समोर टाकले जात असे. पैसे देण्यास नकार दिल्यास त्यांना धमकावले जाई.
तरुणाच्या हुशारीमुळे फोड झाला रॅकेटचा
बोरीवलीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने या रॅकेटचा भांडाफोड केला. ‘दिशा’ नावाच्या तरुणीसोबत त्याची डेटिंग अॅपवर ओळख झाली. दुसऱ्याच दिवशी भेटण्याचे ठरले आणि ते बोरीवलीतील एका हॉटेलमध्ये भेटले. तिथे दारू, हुक्का आणि एनर्जी ड्रिंक्स ऑर्डर करण्यात आले. काही वेळात वेटरने ३५,००० रुपयांचे बिल दिले. हे बिल पाहून तरुण हादरला आणि पैसे देण्यास नकार दिला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला धमकावले असता त्याने प्रसंगावधान राखून १०० नंबर डायल करून पोलिसांना बोलावले. पोलिस पोहोचताच हॉटेल स्टाफ गप्प झाला आणि बिल ३०,००० रुपयांवर आणले. दिशा नावाच्या तरुणीने अर्धे बिल देण्याचे मान्य केले. तर तरुणाने १५,००० रुपये दिले.
पैसे कुठे गेले याचा लागला शोध
घरी पोहोचल्यावर तरुणाने ट्रान्झॅक्शन तपासले असता धक्कादायक बाब समोर आली, पैसे रेस्टॉरंटच्या खात्यात गेले नसून एका खासगी युपीआय (UPI) आयडीवर ट्रान्सफर झाले होते. त्यानंतर त्याने थेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. संबंधित युपीआय आयडी ट्रेस करून, कॉल रेकॉर्ड्स आणि दिशाची चौकशी केली असता संपूर्ण रॅकेट उघडकीस आले.
रॅकेटचा पडदा फाटला – २१ जण अटकेत
पोलिसांनी या प्रकरणात २१ जणांना अटक केली आहे, ज्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. ही टोळी संगनमताने तरुणांना आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत होती. सध्या पोलीस या टोळीच्या संपूर्ण नेटवर्कचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी काही हॉटेल्स व अॅपवरच्या बनावट प्रोफाईल्सचा समावेश असण्याची शक्यता आहे.
डेटिंग अॅप वापरताना काळजी घ्या
1. वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्या
- पूर्ण नाव, पत्ता, कामाचं ठिकाण, आर्थिक माहिती, मोबाईल नंबर इ. लगेच शेअर करू नका.
- सोशल मिडिया लिंक किंवा ऑफिसचा तपशील लगेच देणे टाळा.
2. फेक प्रोफाइल्सपासून सावध राहा
- अतिशय परिपूर्ण फोटो, अत्यंत आकर्षक बायो किंवा कमी माहिती असलेले प्रोफाईल्स संशयास्पद असू शकतात.
- गूगल रिव्हर्स इमेज वापरून त्यांचा फोटो फेक आहे का ते तपासा.
3. व्हिडीओ कॉलवर आधी ओळख पक्की करा
- प्रत्यक्ष भेटण्याआधी किमान एकदा व्हिडीओ कॉल करून खात्री करा की समोरचा व्यक्ती खरी आहे.
4. एकट्याने, अनोळखी ठिकाणी भेटू नका
- पहिली भेट सार्वजनिक ठिकाणी (कॅफे, मॉल, पार्क वगैरे) असावी.
- आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या भेटीबद्दल कल्पना द्या.
5. पैसे किंवा आर्थिक मदतीच्या विनंतीपासून दूर रहा
- “आपत्कालीन गरज आहे”, “माझ्या आईचा अपघात झाला” अशा कारणांवर पैसे मागणं हे स्पष्ट फसवणुकीचं लक्षण असतं.
6. युपीआय / बँक ट्रान्झॅक्शन करताना दक्षता घ्या
- अनोळखी व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू नका.
- कोणत्याही लिंकवर क्लिक करून पेमेंट करण्याचे टाळा.
7. ओटीपी शेअर करू नका
- कोणतीही खात्रीशीर संस्था किंवा व्यक्ती ओटीपी विचारत नाही. हे फसवणुकीचे लक्षण असते.
8. तुमचं लोकेशन शेअर करताना काळजी घ्या
- “Live Location” शेअर करणं टाळा, विशेषतः जर तुमचं नातं अजून नवीन असेल.
9. भावनिक ब्लॅकमेलिंग ओळखा
- जर एखादी व्यक्ती भावनिक ओझं टाकत असेल, सतत संपर्कात राहायला भाग पाडत असेल, तर ते टॉक्सिक असू शकतं.
10. तक्रार करण्यास अजिबात संकोच करू नका
- काही गडबड वाटल्यास त्वरित डेटिंग अॅपवर रिपोर्ट करा आणि आवश्यक असल्यास पोलिसांकडे तक्रार द्या.
11. डेटिंग अॅप्सचे सेटिंग्स नीट तपासा
- तुमचा प्रोफाईल कोण पाहू शकतो, तुमचे फोटोज कुणी डाउनलोड करू शकतो हे सेटिंग्जमध्ये पाहा.
12. इमोशनल इन्व्हॉल्वमेंटपूर्वी वेळ द्या
- कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. तुमचं मानसिक आणि आर्थिक भलं तुमच्याच हातात आहे.
डेटिंग अॅप्स ही एक संधी असली, तरी धोका टाळण्यासाठी सजग राहणं आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट “खूप चांगली वाटतेय” अशी वाटली, तर थोडा वेळ थांबा आणि विचार करा आणि मगच निर्णय घ्या.

