(पुणे)
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) संघटन बळकट करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीचे नेतृत्व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले, तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत महापालिका निवडणुकांनंतर पक्षाची रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि शहरातील विकासकामांची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नगरसेवकांनी आपल्या प्रभागात मूलभूत सुविधा पुरवण्यावर भर द्यावा, नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात आणि विकासकामांना गती द्यावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देत पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील कामगिरी मजबूत ठेवण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी एमएनजीएल गॅस पुरवठ्याच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली. उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांना सुरळीत गॅस पुरवठा होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावरून याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे सांगत, जाणीवपूर्वक कृत्रिम तुटवडा निर्माण करून पुरवठ्यात अडथळे आणले जात असतील तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
हॉटेल आणि उद्योग व्यवसाय हा शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने गॅस पुरवठ्यातील अडथळे अजिबात सहन केले जाणार नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा कठोर निर्णय घेण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्या चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या सीडीआर प्रकरणावरही उदय सामंत यांनी भाष्य केले. काही नेत्यांशी झालेल्या फोन संभाषणाचा अर्थ त्या व्यक्तीच्या कृत्यांना समर्थन असा होत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, अशोक खरात याने काही संभाषणांचा गैरफायदा घेत स्वतःच्या कृत्याला पाठिंबा असल्याचा आभास निर्माण केला आहे. कारण आमच्या बाजूला येऊन अनेक लोक फोटो, व्हिडीओ घेतात. आम्ही त्यांना पूर्ण ओळखतही नसतो, मग त्या व्यक्तीने नंतर काही चुकीचं कृत्य केलं, तर त्याच्या कृत्यात आम्ही सामील आहोत का? असा प्रश्नही उदय सामंत यांनी उपस्थित केला. शिवसेना पक्ष अशा दिशाभूल करणाऱ्या कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत समर्थन देणार नाही, असे ठामपणे सांगत समाजात चुकीचा संदेश पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
या बैठकीत विकासकामांना गती देणे, संघटन मजबूत करणे आणि स्थानिक प्रश्नांवर तत्काळ उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर गॅस पुरवठा आणि सीडीआर प्रकरणावर घेतलेली स्पष्ट भूमिका लक्षवेधी ठरली असून, आगामी काळात पिंपरी-चिंचवडमधील राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

