(मुंबई)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहनाशी संबंधित अँटिलिया प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालय यांनी मंगळवारी नकार दिला.
या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष राष्ट्रीय तपास संस्था (NIA) न्यायालयाने शर्मा यांची दोषमुक्तीची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तपास यंत्रणेकडे शर्मा यांच्या सहभागाचे पुरेसे पुरावे असल्याचा दावा मान्य करत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यामुळे या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर झाली.
कटाचा मुख्य सूत्रधार प्रदीप शर्मा – NIAचा दावा
या प्रकरणात तपास यंत्रणेकडून उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार, कथित कटाच्या अनेक बैठका मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत झाल्या होत्या. या बैठकींना प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी उपस्थित होते. प्रमुख आरोपी सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या पूर्वतयारीसाठी प्रदीप शर्मा यांना सुमारे ४५ लाख रुपये दिल्याचाही उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
२५ फेब्रुवारी २०२१ रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. या घटनेनंतर ४ मार्च २०२१ रोजी त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळून आला. हिरेन यांनी त्याआधी संबंधित कार चोरीला गेल्याची तक्रारही दाखल केली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) कडे होता. मात्र एप्रिल २०२१ मध्ये राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांनी तपास हाती घेतल्यानंतर तत्कालीन एपीआय सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि इतर नऊ जणांना अटक करण्यात आली.
या प्रकरणात पुरावे नष्ट करणे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येत सचिन वाझे यांना मदत केल्याचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर आहे.
कोण आहेत प्रदीप शर्मा?
प्रदीप शर्मा हे १९८३ साली पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांनी अनेक वर्षे मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्ये काम केले. मुंबई पोलिसांमधील सर्वाधिक एन्काउंटर करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नावावर सुमारे ११३ गँगस्टरचे एन्काउंटर असल्याचे सांगितले जाते. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला आणि रफीक डबा यांसारख्या अनेक कुख्यात गुंडांचा त्यांनी एन्काउंटर केला होता. मात्र त्यांच्या कारकिर्दीत अनेक वादही झाले. लखन भैया बनावट एन्काउंटर प्रकरणात २०१० साली त्यांना अटक झाली होती. नंतर निर्दोष सुटल्यानंतर २०१३ मध्ये ते पुन्हा सेवेत रुजू झाले. पुढे ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले. २०१७ मध्ये त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याला अटक केली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि २०१९ मध्ये नालासोपारा मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.
वाझेच्या याचिकेवर NIAला उत्तर देण्याचे आदेश
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांनी विशेष NIA न्यायालयात दोषमुक्तीसाठी नवी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात आपल्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत लावण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ला यावर आपले उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

