( मुंबई )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा घेण्यात आली होती. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा पार पडली होती.
निकाल जाहीर करण्यापूर्वी उद्या सकाळी ११ वाजता राज्य मंडळ कार्यालयात अधिकृत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.
विक्रमी वेळेत निकाल जाहीर करण्याची परंपरा कायम
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात आला होता, तर आता दहावीचाही निकाल अवघ्या काही दिवसांत जाहीर होत आहे.
पूर्वी दहावी-बारावीचे निकाल जून महिन्यात लागायचे. मात्र आता निकाल लवकर जाहीर होत असल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया आणि पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यास मोठी मदत होत आहे.
दहावीचा निकाल कुठे पाहाल?
विद्यार्थ्यांना पुढील अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे :
http://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
http://mahahsscboard.in

