( खेड / वार्ताहर )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीच्या पुलावर आज ( बुधवार) सायंकाळी सुमारे ६.१० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. कंटेनर पुलावरील नियंत्रण सुटल्याने थेट जगबुडी नदीच्या पात्रात कोसळला. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, कंटेनरमधील चालक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. हा कंटेनर चिपळूणहून महाडच्या दिशेने जात असल्याचे समजते, तसेच त्यामध्ये मॅगीचे बॉक्स असल्याचे स्थानिकांमध्ये बोलले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिस, तसेच अन्य संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आहे. नदीपात्रात कोसळलेल्या कंटेनरपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू असून, चालकाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कंटेनरमध्ये मॅगीचे बॉक्स भरलेले असल्याचे समजते. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेग, तांत्रिक बिघाड किंवा अन्य कोणते कारण या दुर्घटनेस कारणीभूत ठरले, याचा तपास पोलीस करत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीचा पूल हा अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जातो. यापूर्वीही या पुलावर अनेक लहान-मोठे अपघात घडले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या पुलाच्या सुरक्षिततेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत असतात. प्रत्येक मोठ्या अपघातानंतर कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी होत असली, तरी अशा दुर्घटनांची मालिका अद्यापही थांबलेली नाही.
दरम्यान, या घटनेबाबत अधिकृत माहिती आणि बेपत्ता चालक बाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबी स्पष्ट होणार आहेत.

