( संगमेश्वर / एजाज पटेल )
समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या आयुष्यात सण-उत्सव अनेकदा दूरच राहतात. मात्र अशाच कर्तव्याच्या धावपळीमध्ये माणुसकीचा आणि आपुलकीचा एक भावूक क्षण संगमेश्वर पोलीस ठाण्यात पाहायला मिळाला. निमित्त होते येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल योगिता बरगळे आणि विश्वास बरगळे या पती-पत्नीच्या आयुष्यातील खास दिवसाचे.
९ मार्च हा दिवस बरगळे दाम्पत्यासाठी दुहेरी आनंद घेऊन आला. त्यांच्या वैवाहिक आयुष्याला १२ वर्षे पूर्ण झाली, तर याच दिवशी योगिता बरगळे यांनी आपल्या आयुष्याच्या ३५ व्या वर्षात पदार्पण केले. वाढदिवस आणि लग्नवाढदिवस असा दुर्मिळ योग एकाच दिवशी जुळून आल्याने हा दिवस अधिकच खास ठरला.
पोलीस सेवेत काम करताना कुटुंबासोबत साधे काही क्षण घालवणेही कठीण असते. अशा परिस्थितीत संगमेश्वर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या दाम्पत्याचा आनंद आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे साजरा केला. पोलीस ठाण्यातच केक कापून वाढदिवस आणि लग्नवाढदिवसाचा छोटेखानी सोहळा आयोजित करण्यात आला. टाळ्यांच्या कडकडाटात आणि शुभेच्छांच्या वर्षावात काही काळ पोलीस ठाण्याचे वातावरण आनंदाने भरून गेले.
खाकी वर्दीतील जबाबदाऱ्या सांभाळताना बरगळे दाम्पत्याने गेली १२ वर्षे संसार आणि कर्तव्य दोन्ही तितक्याच समर्थपणे पार पाडले आहे. सहकाऱ्यांनी दाखवलेले प्रेम आणि आत्मीयता पाहून योगिता आणि विश्वास बरगळे हे दाम्पत्य भावूक झाले.
या निमित्ताने पोलीस दलातील सहकाऱ्यांमधील कौटुंबिक नाते आणि आपुलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या खाकी वर्दीतील या दाम्पत्याचा हा आनंदोत्सव संगमेश्वर परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

