(खेड / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावर खेडजवळ झालेल्या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारने महामार्गाच्या कडेने चालणाऱ्या दोन व्यक्तींना जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या प्रकरणी खेड पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.
ही दुर्दैवी घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास लोटे एमआयडीसीतील रिव्हरसाईड कॉलनीजवळील बेमील सीईटीपी टाकीसमोर घडली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव चंद्रशेखर जकंद सरोज (५६) असे असून, गंभीर जखमी झालेल्याचे नाव सुनील कुमार कश्यप (३५) असे आहे. दोघेही महामार्गाच्या कडेने पायी चालत होते.
दरम्यान, मुंबईच्या दिशेने वेगात धावणाऱ्या स्विफ्ट डिझायर (MH-03/B5-6181) या कारवरील चालक तेजस सदानंद तावडे (४२, रा. भांडुप, मुंबई) याने वाहनावरील नियंत्रण गमावले. निष्काळजी आणि बेदरकारपणे कार चालवत असलेल्या तावडेने सरोज आणि कश्यप या दोघांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात सरोज यांचा जागीच मृत्यू झाला, तर कश्यप गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात रस्त्यालगतच्या वस्तूंनाही मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी जगत पाल सत्यनारायण (२०, रा. रिव्हरसाईड कॉलनी, लोटे) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, आरोपी तावडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

