(खेड)
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरवळ जावळी (दत्तवाडी) या छोट्याशा गावातील सुपुत्र मेजर रूपेश मनोहर जाधव यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल (Lt Col) या वरिष्ठ पदावर पदोन्नती झाली आहे. जोधपूर येथे पार पडलेल्या या सोहळ्याने परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
या पदोन्नती सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे रूपेश जाधव यांच्या आई-वडिलांची उपस्थिती. त्यांचे वडील, निवृत्त हवालदार मनोहर चंद्रू जाधव आणि मातोश्री सौ. मनीशा मनोहर जाधव यांनी स्वतः आपल्या मुलाच्या खांद्यावर लेफ्टनंट कर्नल पदाचे स्टार्स लावले. हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत भावूक आणि अभिमानास्पद ठरला. एका निवृत्त सैनिकासाठी आपल्या मुलाने आपल्यापेक्षा उच्च पद गाठणे, यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
रूपेश जाधव यांचा प्रवास…
१३ एप्रिल २०१३ रोजी रूपेश जाधव भारतीय सैन्य दलाच्या आर्मी मेडिकल कोअर (AMC) मध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. गेल्या १३ वर्षांच्या सेवेत त्यांनी देशाच्या विविध दुर्गम आणि आव्हानात्मक भागांत कर्तव्य बजावत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कर्तृत्व, शिस्त आणि सेवाभावाच्या जोरावर त्यांनी ही यशस्वी मजल गाठली आहे.
त्यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण खेड तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे.

