(खेड / वार्ताहर)
राज्यभरात ग्रामसेवकांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा चालविण्यासाठी गावातील सरकारी कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्याचे पत्र नुकतेच निर्गमित करण्यात आले आहे. मात्र, गावात इतर सरकारी कर्मचारी उपलब्ध असतानाही केवळ मुख्याध्यापक आणि शिक्षकांनाच ग्रामसभेच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडने याला ठाम विरोध केला आहे.
यासंदर्भात शिक्षक समितीच्या खेड शाखेने खेडचे गटविकास अधिकारी विजय करपे यांना लेखी निवेदन देत ग्रामसभेचे सचिव म्हणून शिक्षकांची नियुक्ती करू नये, अशी मागणी केली. शिक्षकांना ग्रामसभेच्या कामाची जबाबदारी दिल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने हे काम शिक्षकांना देण्यात येऊ नये, अशी आग्रही भूमिका समितीने मांडली.
ग्रामसभेच्या सचिवपदासाठी गावातील उपलब्ध इतर सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. ग्रामसभेचे सचिव नियुक्त करताना मुख्याध्यापक आणि प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात यावे, तसेच याबाबत संबंधित प्रशासकांना अवगत करण्यात यावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडने लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिक्षक समिती खेड तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन सुनील दळवी, शरद भोसले, अजित भोसले, शैलेश पराडकर, नरेश ठोंबरे आणि बबन मोरे आदी समिती कार्यकर्ते उपस्थित होते.

