(ठाणे)
अंबरनाथमधील आनंद नगर MIDC परिसरात असलेल्या श्री गणेश केमिकल्स कंपनीत सोमवारी (सायंकाळी सुमारे 6 वाजता) भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर काही मिनिटांतच कंपनीतील रासायनिक ड्रमचे मोठे स्फोट होऊ लागल्याने संपूर्ण औद्योगिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक साठा असल्यामुळे आग वेगाने पसरली आणि अनेक ड्रमचे स्फोट झाले. या स्फोटांचा हादरा तब्बल दोन किलोमीटर अंतरापर्यंत जाणवल्याची माहिती मिळत आहे.
कामगारांची जीव वाचवण्यासाठी धावपळ
स्फोट होताच परिसरातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक कामगारांनी हातातील काम सोडून जिवाच्या आकांताने बाहेर धाव घेतली. औद्योगिक परिसरातील रस्त्यांवर कामगार सैरावैरा धावताना दिसून आले. आगीचे रौद्ररूप पाहता ती शेजारील काही कंपन्यांपर्यंतही पसरल्याची माहिती आहे. स्फोटांमुळे रासायनिक पदार्थ MIDC च्या रस्त्यावर सांडले आणि काही ठिकाणी रस्त्यावरही आग लागल्याचे दृश्य दिसून आले.
आगीची तीव्रता लक्षात घेता MIDC अग्निशमन केंद्राने जिल्ह्यातील इतर महापालिका तसेच औद्योगिक क्षेत्रांतील अग्निशमन दलांकडून मदत मागवली आहे. अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जखमींची माहिती अद्याप अस्पष्ट
या भीषण आगीत किती जण जखमी झाले किंवा कोणती हानी झाली याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनेमुळे संपूर्ण अंबरनाथ औद्योगिक परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.

