(मुंबई)
राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने पोलीस दलातील एकूण 15,631 रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली असून, या भरती प्रक्रियेसाठी गृह विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. विशेष म्हणजे, सन 2022 ते 2025 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही यावेळी अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
15 हजारांहून अधिक पदांसाठी भरती
2024 मध्ये रिक्त असलेली तसेच 2025 मध्ये रिक्त होणारी पदे या भरतीत समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅण्डस्मन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या पाच संवर्गांचा समावेश आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
वयोमर्यादा शिथिलतेचा लाभ
गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरती रखडल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपली होती. उमेदवार आणि संघटनांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शासनाने हा दिलासादायक निर्णय घेतला आहे. शासन परिपत्रकानुसार, सन 2022 ते 2025 दरम्यान कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकवेळचा विशेष अपवाद म्हणून अर्ज करण्यास पात्र ठरविण्यात आले आहे.
पदांचा तपशील
- पोलीस शिपाई : 10,908
- पोलीस शिपाई चालक : 234
- बॅण्डस्मन : 25
- सशस्त्र पोलीस शिपाई : 2,393
- कारागृह शिपाई : 554
उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
ही भरती प्रक्रिया हजारो तरुणांसाठी मोठी संधी ठरणार आहे. विशेषतः वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी हा निर्णय दिलासादायक असून, त्यांच्या पोलीस सेवेत दाखल होण्याच्या स्वप्नाला नवी दिशा मिळणार आहे. गृह विभागाने उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे अपडेट्स तपासण्याचे आवाहन केले आहे. लवकरच अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

