( रत्नागिरी )
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काळबादेवी शाखेतर्फे बुधवार, ६ मार्च रोजी पाथरदेव बस स्टॉप, काळबादेवी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शाखाप्रमुख कै. सत्यजित (सत्या) वायंगणकर यांच्या निधनानंतर गेल्या आठ वर्षांपासून हा उत्सव साजरा झाला नव्हता. ही परंपरा पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांचे पुत्र ओंकार सत्यजित वायंगणकर यांनी पुढाकार घेत विशेष प्रयत्न केले.
शिवजयंतीनिमित्त काळबादेवी शाखा आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला काळबादेवी, बसणी आणि कासारवेली परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सायंकाळी श्री सत्यनारायणाची महापूजाही भक्तिभावाने पार पडली. या कार्यक्रमाला उबाठा गटाचे तालुका प्रमुख शेखर घोसाळे, विभाग प्रमुख मयुरेश्वर पाटील, शहर प्रमुख साळुंखे, ज्येष्ठ शिवसैनिक बंडयाशेठ पेटकर तसेच उपविभाग प्रमुख अमित धांगडे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बसणी शाखाप्रमुख महेश नेवरेकर, समाजसेवक आबू भाटकर, कासारवेलीचे उपसरपंच वैभव (गुड्डया) बोरकर, संतोष नेवरेकर आणि काळबादेवी उपशाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले.

