(खेड)
मुंबई–गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे शिंदेवाडी परिसरात भरधाव वेगातील दुचाकीचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत प्रवास करणारा मित्र गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अद्वैत प्रवीण गीते हा तरुण आपल्या मित्रासह रॉयल एनफिल्ड जीटी ६५० या दुचाकीवरून मुंबई–गोवा महामार्गाने कळंबनीच्या दिशेने जात होता. भरणे गावाच्या हद्दीत शिंदेवाडी परिसरात दुचाकी भरधाव वेगात असताना अचानक चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी घसरली. या अपघातात अद्वैत गीते हा महामार्गाच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर जोरात आपटला. डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने कळंबनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अद्वैत गीते हा नवभारत हायस्कूलचे शिक्षक प्रवीण गीते यांचा मुलगा असून त्यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील तिसंगी आहे. अपघाताची माहिती मिळताच भरणे परिसरातील नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अद्वैतचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच सर्वत्र शोककळा पसरली. दरम्यान, अद्वैत हा आपल्या मित्रांसमवेत जेवणासाठी कळंबनीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.

