(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी किनारपट्टीवर अनधिकृत पद्धतीने एलईडी लाईटच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने मध्यरात्री धडक कारवाई करत संबंधित नौका ताब्यात घेतली. मिऱ्या-काळबादेवी समुद्र परिसरात शनिवारी (४ एप्रिल) पहाटे सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे मिरकरवाडा ते गणपतीपुळे या सागरी पट्ट्यात नियमित गस्त सुरू असताना अंमलबजावणी अधिकारी स्मितल कांबळे यांच्या पथकाला भगवतीबंदर-राजवाडी येथील कैलास उल्हास कुबल यांच्या मालकीची ‘भराडी प्रसन्न’ (आयएनडी-एमएच-०४-एमएम-३७२३) ही मासेमारी नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मिऱ्या-काळबादेवी समुद्रासमोर संशयास्पद स्थितीत नांगरून ठेवलेली आढळली.
तपासणीअंती नौकेवर एलईडी लाईटच्या सहाय्याने मासेमारी करण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अनधिकृत मासेमारीच्या उद्देशाने वापरण्यात येणारे एलईडी लाईट आणि जनरेटर यासह संपूर्ण नौका तात्काळ जप्त करण्यात आली. पुढील कार्यवाहीपर्यंत नौका मिरकरवाडा बंदरात ठेवण्यात आली आहे. कारवाईदरम्यान नौकेवर तांडेलसह पाच खलाशी उपस्थित होते. या प्रकरणी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) अध्यादेश, २०२१ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
या मोहिमेत अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी स्मितल कांबळे यांच्यासह सुरक्षा रक्षक सुजन पोवार, अमोल पिलणकर, अनिकेत पवार आणि भूषण करमरकर यांनी सहभाग घेतला. समुद्रातील बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी विभागाकडून गस्त आणि कारवाई अधिक तीव्र करण्यात येत असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले.

