(गणपतीपुळे / वैभव पवार)
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड, कवी केशवसुत स्मारक मालगुंड आणि कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रावणधारा मनामनातील’ हा काव्यसरींचा कार्यक्रम नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात परिसरातील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण आणि खुल्या गटातील कवींनी आपल्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे माजी सैनिक रामचंद्र सावंत यांच्या हस्ते कविवर्य केशवसुत यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. देवी सरस्वती आणि कवी केशवसुत यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनानंतर काव्यसरींचा प्रवास सुरू झाला.
विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांना उत्स्फूर्त दाद
या काव्यमहोत्सवात श्रावण, पाऊस, कारगिल विजय दिन आणि ऑपरेशन सिंदूर या विषयांवर कवींनी आपल्या रचना सादर केल्या. विशेष म्हणजे परिसरातील अनेक शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता गेय शैलीत, हावभावांसह सादर करून उपस्थितांना भारावून टाकले. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विद्यार्थ्यांना हुरूप मिळाला.
कविंचा सहभाग व नवे संकल्प
या कार्यक्रमात युवाशक्ती दक्षिण कोकण प्रमुख अरुण मोर्ये, शाखा युवाशक्ती प्रमुख अमेय धोपटकर आणि ज्येष्ठ सदस्या उज्ज्वला बापट यांनीही आपल्या कविता सादर केल्या. यावेळी कवी केशवसुत स्मारकाचे कोषाध्यक्ष रवींद्र मेहेंदळे यांनी भारतीय वर्षातील सहा ऋतूंप्रमाणे कवी संमेलने आयोजित करण्याची सूचना केली, जी त्वरित मान्य करण्यात आली.
कारगिल विजय दिनानिमित्त सन्मान
कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक रामचंद्र सावंत यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांनी उपस्थितांना सैनिकांचे जीवन, त्यांचे दैनंदिन आव्हान आणि कारगिल विजयाची माहिती दिली. त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषद मालगुंड शाखेचे मनःपूर्वक आभार मानून, सैनिकांप्रती आदर राखण्याचे आवाहन केले.
यावेळी पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल अध्यक्ष गजानन पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, सचिव विलास राणे, सहसचिव रामानंद लिमये, युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये यांनी परिसरातील शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविला. स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे, अस्मिता दुर्गवळी आणि अदिती मांडवकर यांनीही विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाला अध्यक्ष गजानन पाटील, अध्यक्षा नलिनी खेर, कार्यकारिणी सदस्य डॉ. मोरेश्वर मुळ्ये, प्रभाकर बापट, कोषाध्यक्ष रवींद्र मेहेंदळे यांच्यासह कवी, पालक, शिक्षक व साहित्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक व आभार केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी मानले, तर काव्यवाचनाचे निवेदन अरुण मोर्ये व अमेय धोपटकर यांनी केले.