(मुंबई)
राज्याचे हास्यसम्राट आणि अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देशाचा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा सोहळा मंगळवारी (२७ मे २०२५) रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात संपन्न झाला.
या वर्षीच्या दुसऱ्या नागरी सन्मान वितरण सोहळ्यात ६८ प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, आणि सार्वजनिक जीवनातील अनेक क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश होता. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही उपस्थिती लाभली. या विशेष प्रसंगी त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ, तसेच भाऊ सुभाष सराफ उपस्थित होते.
अशोक सराफ यांनी पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले, “हा सन्मान माझ्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि अभिमानास्पद क्षण आहे. पुरस्कार मिळणे हीच मोठी बाब आहे. मला पात्र समजण्यात आले, याचा आनंद आहे – म्हणजे मी आयुष्यात काहीतरी चांगले केले असावे.” पद्मश्री जाहीर होण्यास उशीर झाल्याचा उल्लेख करता ते म्हणाले, “मला पुरस्कार मिळाला, हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. विसरले असते तर कदाचित मी काहीतरी बोललो असतो. पण त्यांनी लक्षात ठेवले, यासाठी मी कृतज्ञ आहे.”
पुरस्कार प्राप्तीनंतर त्यांनी एक भावनिक पोस्टही शेअर केली, “‘पद्मश्री’ हा माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे, माझ्या कुटुंबाचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार मानतो. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झाले नसते. तुमचा प्रेम आणि आशीर्वाद कायम असाच राहो.”
अभिनयातील सहजता, टायमिंग आणि विविध भावछटांचे सशक्त सादरीकरण या बाबींसाठी त्यांना हा सन्मान मिळाला. अशोक सराफ यांचे ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुम धडाका’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ आणि ‘पंढरीची वारी’ यासारखे अनेक चित्रपट रसिकांच्या हृदयात कायमचे घर करून आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपार यश मिळवले असून, तो आजही मराठी रसिकांचा आवडता चित्रपट आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्येदेखील अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अशोक सराफ यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांनी देखील केले होते.