( मुंबई )
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समध्ये होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवच्या फिल्म मार्केट (मार्शे द्यु फिल्म) विभागात मराठी चित्रपट “जीव – द क्रियेचर” आणि “एप्रिल मे ९९” यांची निवड करण्यात आली आहे. ही घोषणा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी मंगळवारी (२८ एप्रिल) केली. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी या यशाबद्दल संबंधित टीमचे अभिनंदन केले.
“जीव – द क्रियेचर” हा चित्रपट महाराष्ट्रातील आदिवासी कोकणी समाजाच्या परंपरा आणि रूढींवर आधारित असून त्याचे दिग्दर्शन रवींद्र जाधव यांनी केले आहे. तर रोहन मापुसकर दिग्दर्शित “एप्रिल मे ९९” हा चित्रपट मैत्रीतील नातेसंबंध, प्रेमाची सुरुवात, स्वतःचा शोध आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या आठवणी याभोवती गुंफलेला आहे.
फ्रान्समध्ये १२ ते २२ मेदरम्यान हा प्रतिष्ठेचा महोत्सव पार पडणार असून, फिल्म मार्केट विभागात २०१६ पासून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महामंडळ सातत्याने सहभागी होत आहे. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे आणि जागतिक प्रेक्षकांपर्यंत त्यांची पोहोच वाढावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या चित्रपटांच्या निवडीसाठी तज्ज्ञ परीक्षक समिती गठित करण्यात आली होती. या समितीत छाया कदम, अमोल परचुरे, तृप्ती भोईर, भाऊसाहेब कऱ्हाडे आणि विजय खोचीकर यांचा समावेश होता.
मराठी सिनेसृष्टीसाठी ही निवड महत्त्वाची मानली जात असून, जागतिक स्तरावर मराठी कथांना नवे दालन खुलं होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

