(मुंबई / वृत्तसंस्था)
महाराष्ट्रासह भारतीय चित्रपट आणि दृक्-श्राव्य क्षेत्राला गेल्या पाच दशकांपासून निर्मितीसाठी सक्षम व्यासपीठ आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ आज सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यासोबतच सुवर्ण महोत्सवी गीताचे लोकार्पण तसेच चित्रनगरीच्या पाच दशकांच्या प्रवासाचा आढावा घेणाऱ्या दृक्-श्राव्य चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. चित्रनगरीच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पे आणि ऐतिहासिक क्षण अधोरेखित करणाऱ्या कॉफीटेबल बुकचे तसेच ‘चित्रपताका’ या नियतकालिकाचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले.
चित्रनगरीच्या विकासासह मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या विविध निर्मिती संस्थांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे-पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कलाकार, निर्माते आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते.
दादासाहेब फाळके चित्रनगरीने गेल्या ५० वर्षांत मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, विविध दृक्-श्राव्य निर्मिती आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक चित्रीकरण व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत चित्रनगरीने या क्षेत्राच्या विकासाला सातत्याने हातभार लावला आहे.
सामाजिक बांधिलकी जपत चित्रनगरीचा पुढाकार
चित्रनगरीने चित्रपट आणि दृक्-श्राव्य क्षेत्राच्या विकासासोबतच सामाजिक बांधिलकीही जपली आहे. यापूर्वी दुष्काळी परिस्थितीत चित्रनगरीच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्यात आले आहे. यंदाही चित्रनगरीच्या ४९व्या वर्धापनदिनानिमित्त आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच वार्षिक अहवालानंतर नफ्यातून २ कोटी रुपयांचा लाभांश शासनास देण्यात आला. चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे-पाटील यांनी यासंदर्भातील दोन्ही धनादेश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्याकडे सुपूर्त केले.
पाच दशकांचा समृद्ध वारसा आणि अनुभव सोबत घेऊन आधुनिक, सक्षम आणि जागतिक दर्जाच्या चित्रनगरीच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प सुवर्ण महोत्सवी वर्षातून करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीला नवी दिशा देण्यासोबतच देश-विदेशातील निर्माते आणि चित्रपट क्षेत्रातील विविध घटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणाऱ्या चित्रनगरीच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात या वर्षातून होत आहे.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध सांस्कृतिक, कलात्मक आणि चित्रपटविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या उपक्रमांशी जोडण्यात येणार आहे. पन्नास वर्षांच्या समृद्ध वारशाचे स्मरण करण्यासोबतच भविष्यातील चित्रपट आणि दृक्-श्राव्य क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन चित्रनगरीच्या विकासाची नवी दिशा निश्चित करण्यात येणार आहे.


