(रत्नागिरी)
शहरातील स्थानिक कलाकारांच्या हक्काच्या व्यासपीठाची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील नूतनीकृत व अत्याधुनिक सभागृहाचे लोकार्पण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते दिमाखदार वातावरणात पार पडले. या सभागृहाच्या माध्यमातून रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि कलाविश्वाला नवे बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शनिवार रात्री झालेल्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रमांनी वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्युट व वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांच्या मंगल मंत्रोच्चाराने झाली. मंत्रोच्चाराच्या वातावरणात कोनशिलेचे अनावरण आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
यानंतर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.ए. परफॉर्मिंग आर्ट्स विभागातील विद्यार्थ्यांनी प्रा. आनंद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककला, भारुड आणि लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
६४ व्या अखिल भारतीय राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयात प्रथम क्रमांक मिळवणारे युवा कलाकार मीनार गजानन पाटील यांचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विशेष कौतुक केले. याचवेळी प्रा. आनंद आंबेकर आणि डॉ. शशांक पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. सामंत म्हणाले, “रत्नागिरीत कलाकारांसाठी अत्याधुनिक सभागृहाची नितांत गरज होती. ही गरज लक्षात घेऊन अल्पावधीत हे सभागृह सज्ज करण्यात आले आहे. या व्यासपीठामुळे स्थानिक कलाकारांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी उत्तम संधी मिळेल.”
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, डॉ. राजश्री देशपांडे, प्राचार्य कीर्तीकुमार भोसले, समीर इंदुलकर, अनिल दांडेकर यांच्यासह नगरसेवक, कलाकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनकर मराठे यांनी केले. यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या कार्याचा गौरव करणारे पद्यरूप गौरवपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.

