( मुंबई )
इंडियन नॅशनल सिने अकॅडमी अवॉर्ड्स (INCA Awards) यांच्या पहिल्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हा प्रतिष्ठित आणि भव्य पुरस्कार सोहळा 15 व 16 एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार आहे. भारतातील 12 प्रमुख चित्रपट उद्योगांना एका समान व्यासपीठावर आणणारा ‘इंका’ हा देशातील पहिला राष्ट्रीय चित्रपट अकॅडमी मंच ठरणार आहे.
भाषा, प्रांत आणि भौगोलिक मर्यादा ओलांडत भारतीय सिनेमाची विविधता, सांस्कृतिक समृद्धी आणि जागतिक महत्त्व यांचा समतोल सन्मान करण्याचा हा दूरदृष्टीपूर्ण उपक्रम आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सांस्कृतिक एकात्मतेला संस्थात्मक स्वरूप देणारा हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
जागतिक दर्जाच्या अकॅडमींच्या तोडीचा मंच
‘इंका’ची संकल्पना सेलिब्रिटी क्रिकेट लीग आणि SIIMA यांसारख्या यशस्वी उपक्रमांमागील संकल्पकांच्या दूरदृष्टीतून साकारली आहे. या मंचाचं नेतृत्व विष्णू वर्धन इंदुरी करत असून, प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया हे या उपक्रमाचे प्रमुख संस्थात्मक भागीदार आहेत. त्यामुळे ‘इंका’ला विश्वासार्हता, व्यापक दृष्टी आणि आंतरराष्ट्रीय दर्जा लाभला आहे. पहिल्या INCA Awards चे प्रस्तुत प्रायोजक म्हणून कल्याण ज्वेलर्स सहभागी झाले आहेत. उत्कृष्टता, परंपरा आणि विश्वास या समान मूल्यांवर आधारित ही भागीदारी ‘इंका’च्या प्रतिष्ठेला अधिक बळ देणारी ठरणार आहे.
12 भाषांतील सिनेमांना समान सन्मान
INCA Awards ची रचना अकॅडमी-शैलीतील पुरस्कार प्रणालीवर आधारित असून, पारदर्शकता, तज्ज्ञांकडून मान्यता (Peer Recognition) आणि विश्वासार्हता हा या मंचाचा गाभा आहे. 12 भारतीय भाषांतील प्रत्येक चित्रपट उद्योगासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे प्रमुख पुरस्कार दिले जाणार आहेत. याशिवाय दिग्दर्शन, अभिनय, संगीत, तांत्रिक कौशल्य, पदार्पण आदी विभागांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील (All-India) पुरस्कार देऊन प्रांतिक अभिमानासोबतच राष्ट्रीय उत्कृष्टतेचा सन्मान केला जाणार आहे.
2025 मधील मराठी चित्रपटांसाठी प्रवेशिका खुल्या
2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांसाठी INCA Awards तर्फे निर्माते व दिग्दर्शकांना अधिकृत प्रवेशिका सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पात्रता:
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान प्रदर्शित मराठी चित्रपट
अंतिम तारीख:
1 मार्च 2026
नोंदणी संकेतस्थळ:
www.INCA.in
INCA Awards हा केवळ पुरस्कार सोहळा नसून, तो भारतीय चित्रपटसृष्टीच्या एकात्मिक सांस्कृतिक अभिव्यक्तीचा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक उपक्रम असल्याचं मानलं जात आहे.

