(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरीसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील मंदिरांमध्ये सलग चोऱ्या करून दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अक्षय अर्जुन मोरे (वय २८, रा. गोंदिलवाडी, ता. पलूस, जि. सांगली) आणि संभाजी राजाराम जाधव (वय ३०, रा. विकास कारखान्याजवळ, पलूस, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. चौकशीदरम्यान या दोघांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये चोऱ्या केल्याची तसेच सांगली शहरात घरफोडी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, सांगली शहरातील राम मंदिराजवळील संजोग कॉलनीत राहणारे सम्राट विश्वनाथ माने (वय ५३) यांच्या बंगल्यात २५ डिसेंबर २०२५ रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरू असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन व त्यांच्या पथकाला आरोपी चोरीचा माल विक्रीसाठी सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे दोन्ही संशयित तेथे येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्यांच्या दुचाकीवरील गोणपाटात चांदी, तांबे व पितळेचे पूजेचे साहित्य आढळून आले. तसेच अक्षय मोरेच्या खिशात चार पदरी सोन्याचे मंगळसूत्र सापडले.
पोलिस तपासात पुढे असेही उघड झाले की, अक्षय मोरे याला यापूर्वी मिरज तालुक्यातील आरग येथील पद्मावती मंदिरातील चोरीप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर त्याने संभाजी जाधवच्या मदतीने रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिरांना लक्ष्य केले. २९ सप्टेंबर २०२५ रोजी रत्नागिरीतील एका मंदिरात सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र व हार चोरी केल्याची, तसेच अर्जुनवाड येथील मंदिरातील गणेशमूर्ती चोरी केल्याची बाबही तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या टोळीने आणखी गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

