(मुंबई)
विद्याविहार परिसरात भरधाव कारने स्कूटरला धडक देऊन पती-पत्नीला गंभीर जखमी करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन कार चालकाला शुक्रवारी बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला. या भीषण अपघातात जखमी झालेले ध्रुवमिल पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यांची पत्नी मीनल पटेल अद्याप उपचार घेत आहेत. या प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनाही यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अपघात कसा घडला?
5 फेब्रुवारीच्या रात्री विद्याविहार येथील सोमय्या कॉलेज गेट क्रमांक 3 समोर हा अपघात घडला. 17 वर्षीय मुलगा भरधाव वेगाने किया सेल्टॉस कार चालवत होता. त्याने स्कूटरला जोरदार धडक दिल्याने स्कूटरवरील मीनल आणि ध्रुवमिल पटेल हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी दोघांनाही तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. ध्रुवमिल पटेल हे अति मार लागल्याने अपघातानंतर व्हेंटिलेटरवर होते. मात्र 15 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मीनल पटेल यांच्यावर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याची माहिती आहे.
अल्पवयीन चालक आणि वडिलांवर गुन्हा
अपघातास कारणीभूत असलेला चालक अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यासह त्याच्या वडिलांविरुद्ध टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 आणि 199 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 125, 125(अ), 125(ब) आणि 281 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
परीक्षेमुळे मिळाला जामीन
आरोपी मुलगा बारावीचा विद्यार्थी असल्याने त्याची परीक्षा सुरू असल्याचे कारण देत न्यायालयाने त्याला तात्पुरता जामीन मंजूर केला होता. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर तो पालकांसह बाल न्याय मंडळासमोर हजर झाला असता त्याला नियमित जामीन मंजूर करण्यात आला.
मुंबई पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. अपघातावेळी कारमध्ये चार जण होते. त्यापैकी दोन जण अपघातानंतर पळून गेल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला असून त्यांचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
ध्रुवमिल पटेल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अल्पवयीनांकडून वाहन चालवण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालकांच्या जबाबदारीबाबतही पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

