(रत्नागिरी / वार्ताहर)
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या या अभियानाच्या पाचव्या टप्प्यात रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करत ५० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे.
‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ हा उपक्रम १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आला होता. या उपक्रमात राज्यातील तब्बल २७,८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. पर्यावरणपूरक उपक्रम, स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण आणि ऊर्जा बचतीसाठी केलेल्या कामगिरीच्या आधारे कुवारबाव ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली.
या पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम २१ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथील वरळीतील डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, लाला लजपतराय मार्ग येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते कुवारबाव ग्रामपंचायतीच्या प्रशासक सौ. समीक्षा तळेकर, ग्रामपंचायत अधिकारी विष्णुदास बुंदे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच माजी सरपंच सचिन यशवंत कोतवडेकर आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (डी.एन. १३६) तालुका शाखा रत्नागिरी यांच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी विष्णुदास बुंदे व कर्मचारी वर्गाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी युनियनचे जिल्हा सचिव संजय दळवी, तालुकाध्यक्ष देविदास इंगळे, पतसंस्था संचालक विनोद गुरव, तालुका सहसचिव उल्हास कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

