(तरवळ/ अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज येथे १७ डिसेंबर रोजी दोन सत्रात सकाळी आणि दुपारी घडताना बि घडताना या उद्बोधन पर कार्यक्रमाचे ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थी व पालकांसाठी आयोजन करण्यात आले होते.
मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे माजी अध्यक्ष तसेच मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज चे माजी मुख्याध्यापक आणि महाराष्ट्र शासना कडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, आचार्य कुल पुरस्कार विजेते शिक्षक कै. सदानंद बळीराम परकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक आणि सरांचे चिरंजीव बिपीन सदानंद परकर आणि कुटुंबीय यांच्या माध्यमातून रायगड येथील लेखक, निवेदक, शैक्षणिक, सामाजिक औद्योगिक क्षेत्रातील प्रेरक प्रशिक्षक संजय गोविलकर यांचे घडताना बि घडताना या उद्बोधन पर कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आयोजन करण्यात आले होते.
या उद्बोधन पर कार्यक्रमात मार्गदर्शक संजय गोविलकर यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी पालकांनी काय प्रयत्न करायला हवेत, तसेच विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये कोणकोणत्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात, आणि आपला सर्वांगीण विकास कसा करावा हे आवर्जून सांगितले. तसेच अभ्यासा बरोबर शारीरिक स्वास्थ्य सुद्धा महत्वाचे आहे, आणि त्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी रोज व्यायामासाठी वेळ काढला पाहिजे.
सध्या अनेक ठिकाणी अनिश्चितता तीव्र स्पर्धा, प्रलोभने, ढासळलेली मूल्ये, जागतिकीकरणइत्यादी मुळ्ये काही अनिष्ट गोष्टी प्रत्येकाच्या उंबरठ्या पर्यंत येऊन ठेपल्या आहेत हे दुर्लक्षून चालणार नाही. त्या साठी पालकांनी जागरूक असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे हेच वय असते या वयामध्ये त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते घडतात आणि वाईट संगतीला लागले तर ते बिघडतात, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना या वयात जपलं पाहिजे. आपल्या पाल्याचे जीवन सुखी आणि समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यांच्या पाठी ठाम उभे रहा. त्यांना योग्य मार्गाने मागदर्शन करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासा शिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टी करू नका, अशा अनेक महत्वाच्या गोष्टी आवर्जून पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात आदर्श शिक्षक कै. सदानंद बळीराम परकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, सल्लागार मंडळाचे सदस्य नंदकुमार डिंगणकर, मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

