(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला सोमवारी कमालीचा वेग आला. प्रभाग क्र. ४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शनात आपले अधिकृत उमेदवार दाखल केले. पक्षाचे प्रभाग क्र. ४ मधील उमेदवार श्री. नौसीन काझी तसेच महिला सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवार सौ. मुनव्वर सुलताना फरान मुल्ला यांनी सोमवारी (१७ नोव्हेंबर रोजी ) दिमाखात नामांकन अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस असल्याने सकाळपासूनच नगरपालिकेच्या परिसरात मोठी गर्दी उसळली होती. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, बँड-बाजेचा गजर आणि उमेदवारांच्या समर्थकांची झालेली झुंबड यामुळे परिसरात निवडणूक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या उमेदवारीला जोरकस पाठबळ मिळत असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. स्थानिक प्रश्नांची सोडवणूक, विकासकामांना गती आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन देत दोन्ही उमेदवारांनी विजयाबाबत आत्मविश्वास दर्शविला आहे. निवडणूक कार्यक्रमाला वेग येत असतानाच, नागरिक मात्र उमेदवारांकडून विकासाच्या ठोस भूमिकेची आणि पारदर्शक कारभाराची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

