(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहरातील जयस्तंभ परिसरात एस.टी. स्टॉपसमोर एका तरुणावर लाकडी हॉकीस्टिकने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैयक्तिक वादातून उफाळलेल्या संतापाने घेतलेल्या या हिंसक वळणामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गणेश दत्ताराम महाडिक (रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८ (१), ३५१ (२) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक शशिकांत रहाटे (वय ३४, रा. तेली आळी, रत्नागिरी) हे २० एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता जयस्तंभ येथील एस.टी. स्टॉप परिसरात उभे होते. त्यावेळी आरोपी महाडिक हा आपल्या ईटीओस कारने (क्रमांक एमएच ०२ सीपी २७३६) घटनास्थळी आला. पत्नीशी असलेल्या कथित प्रेमसंबंधांच्या संशयावरून आणि न्यायालयीन घटस्फोट प्रकरणातील वादाच्या पार्श्वभूमीवर त्याने फिर्यादीला लक्ष्य केले. “तू माझ्या पत्नीला फिरायला घेऊन जातोस; तुझं लग्न कसं होतं तेच पाहतो,” अशा शब्दांत धमकी देत आरोपीने रहाटे यांच्याशी वाद घातला. फिर्यादीने विरोध दर्शवताच आरोपीने गाडीतून लाकडी हॉकीस्टिक काढून त्यांच्या अंगावर सपासप प्रहार केले. या हल्ल्यात रहाटे यांच्या डोक्याला, गालावर, ओठांवर तसेच दातांवर गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. जखमी अवस्थेत रहाटे यांनी २१ एप्रिलच्या पहाटे रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार करत आहेत. वैयक्तिक नातेसंबंधातील वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची ही घटना शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक मानली जात आहे.

