(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे गाव आणि परिसर सध्या वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे भीतीच्या छायेत आहे. गवे-रेडे, माकडांचे थैमान आणि त्यात आता बिबट्याचाही मानवी वस्तीत शिरकाव वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ प्रचंड धास्तावले आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या ताज्या घटनेने गावकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
नारडुवे गावातील भागोजी दुर्गावली यांच्या घराच्या अंगणात बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने अचानक झडप घातली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुत्र्याने आटोकाट प्रयत्न केले, मात्र तो बांधलेला असल्याने सुटका होऊ शकली नाही. बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या आणि काही क्षणांतच त्याचा जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या मानवी वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नारडुवे आणि आसपासच्या भागात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र प्रत्यक्ष मानवी वस्तीत घुसून हल्ला झाल्याने ग्रामस्थांची भीती खरी ठरली आहे. या परिसरात गवे-रेड्यांचाही वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ते वारंवार शेतात घुसून पिकांची नासधूस करत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
दरम्यान, माकडांच्या उपद्रवामुळेही शेतकरी हैराण झाले आहेत. पिके तयार झाली की माकडांचे थवे शेतात धाड टाकून मोठे नुकसान करतात. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे दुहेरी संकट कोसळले आहे.
सध्या गावात शिमगोत्सवाची धामधूम सुरू असून चाकरमानी गावात परतल्याने उत्सवाचे वातावरण आहे. मात्र अशा आनंदाच्या वातावरणात भक्षाच्या शोधात बिबट्या थेट मानवी वस्तीत शिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
नारडुवे येथील ग्रामस्थ विजय शिगवण यांनी सांगितले की, गावातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत. आधी माकडांचा प्रचंड त्रास होता, आता गवे-रेडे शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत. त्यातच बिबट्या वस्तीत येऊन जनावरांवर हल्ले करू लागल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.
या घटनेनंतर नारडुवे परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून ग्रामस्थांनी भीतीपोटी रात्री बाहेर पडणे टाळले आहे. लहान मुले, महिला आणि जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने या भागात पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच गवे-रेडे आणि माकडांच्या वाढत्या उपद्रवावर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून होत आहे.

