(फुणगुस / एजाज पटेल)
ग्रामीण भागात कार्यरत असताना प्रामाणिकपणा, चिकाटी आणि लोकाभिमुख सेवाभावाच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करता येते, याचा प्रेरणादायी आदर्श फुणगुस उप-टपाल कार्यालयाच्या शाखा टपालपाल श्रीमती वर्षा देसाई यांनी घालून दिला आहे. रत्नागिरी विभागांतर्गत ग्रामीण भागात सेवा बजावत असताना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल थेट वरिष्ठ स्तरावर घेण्यात आली असून, त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टपाल विभागातर्फे १३ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘महालॉगिन दिन’ उपक्रमात श्रीमती देसाई यांनी टपाल जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) योजनेंतर्गत तब्बल ८१,११९ रुपयांचा नवीन विमा हप्ता संकलित करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली होती. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासकीय विमा योजनांचा प्रभावीपणे प्रसार करून त्यांनी हा टप्पा गाठला होता.
गोवा क्षेत्राच्या संचालकांच्या हस्ते सन्मान
रत्नागिरी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात गोवा क्षेत्राचे संचालक आर. पी. पाटील (भारतीय टपाल सेवा) यांच्या हस्ते श्रीमती वर्षा देसाई यांना मानाचे कौतुक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी रत्नागिरी विभागाचे टपाल अधीक्षक ज्ञानेश एस. कुलकर्णी उपस्थित होते. ग्रामीण भागात कार्यरत राहून उत्कृष्ट सेवा देत शासकीय योजनांचा प्रभावी प्रचार केल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
प्रत्यक्ष भेटींसह सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
या गौरवाची बातमी समजताच फुणगुस परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पंचक्रोशीतील नागरिक, खातेदार, हितचिंतक आणि सहकाऱ्यांनी श्रीमती देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. यासोबतच व्हॉट्सॲप, फेसबुकसह विविध सोशल मीडिया माध्यमांवर त्यांच्या सत्काराचे छायाचित्रे आणि संदेश मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत असून, त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
“हा सन्मान संपूर्ण फुणगुस परिसरातील नागरिकांचा”
पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना श्रीमती वर्षा देसाई म्हणाल्या, “हा सन्मान केवळ माझा नसून फुणगुस उप-टपाल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व खातेदार, नागरिक आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. ग्रामीण भागात काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. मात्र नागरिकांचे सहकार्य आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळवता आले. हा गौरव भविष्यात अधिक जोमाने, प्रामाणिकपणे आणि लोकाभिमुख सेवा देण्याची प्रेरणा देणारा आहे. प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते.”

