(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर एसटी स्टॅन्डसमोर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली असून वाहनचालकांसह प्रवाशांना कोंडीत अडकून त्रास सहन करावा लागत आहे. चौकातून जाणाऱ्या एसटी बस, खाजगी वाहने, दुचाकी वाहतूक यामुळे रस्त्यावर दिवसभर प्रचंड गर्दी असते. परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की, कधी-कधी रुग्णवाहिकादेखील कोंडीत अडकण्याच्या घटना घडल्या आहेत, कायमच निर्माण होणारी ही स्थिती नक्कीच चिंताजनक आहे.
या परिसरात दिवसा वाहतूक पोलीस उपस्थित असल्याने वाहतूक काही प्रमाणात नियंत्रित राहते; परंतु रात्री पोलीस पूर्णपणे अनुपस्थित राहिल्याने चौकाचे चित्र बदलते. वाहतुकीचा ताण जसजसा वाढतो, तसतशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते आणि कोंडी सुटण्याऐवजी वाढतच जाते. रात्रीच्या वेळी पोलीस कर्मचारी चौकात नसल्याने सर्व वाहने आपापल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न किंवा पुढे घुसण्याचा प्रयत्न करत गर्दी अधिकच क्लिष्ट होते. परिणामी, अनेकदा वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिक यांनाच एकमेकांना मदत करत कोंडी सोडवावी लागते.
दररोजच्या या त्रासामुळे वाहनचालक आणि प्रवासी यांनी रात्रीच्या वेळी पोलिसांची तैनाती व्हावी, अशी मागणी वारंवार केली होती. सोशल मीडिया डिजिटल बातम्या तसेच स्थानिक वृत्तपत्रांतून या समस्येचा पाठपुरावा केल्यानंतर पोलिस प्रशासनाने काही दिवसांपूर्वी चौकात रात्री पोलिसांची तात्पुरती नेमणूक केली होती. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मात्र हे समाधान फार काळ टिकले नाही. दोन दिवस उलटताच पुन्हा रात्री ड्युटीवरील पोलीस गायब झाले आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा तीव्र झाला. विशेषत: शुक्रवारी रात्रीची परिस्थिती तर पूर्णपणे हाताबाहेर गेली. चौकातील चारही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोंडी सोडवण्यासाठी चौकात कुठलाही पोलीस कर्मचारी नसल्याने गोंधळ वाढत गेला आणि प्रवाशांना तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागला. काही वाहनचालक तर जवळजवळ अर्धा तासपेक्षा जास्त वेळ जागेवरच अडकून बसले होते.
स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे की, समस्या वारंवार समोर येत असताना पोलिस प्रशासनाने नेमकी कोणती कायमस्वरूपी उपाययोजना केली आहे? रात्री नियमित पोलीस तैनात का केले जात नाहीत? रुग्णवाहिका अडकण्यासारख्या घटनांकडे दुर्लक्ष करणं कितपत योग्य आहे? नागरिकांच्या समस्यांना केवळ काही दिवसांसाठी दिखावा म्हणून तात्काळ उपाय देऊन पुन्हा जुन्या स्थितीत परत जाण्याची पद्धत किती काळ चालणार?
संगमेश्वर परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेता या चौकात रात्रीच्या वेळी कायमस्वरूपी पोलीस तैनात करणे ही आता काळाची गरज बनली आहे. या समस्या तात्पुरत्या उपायांनी सुटणार नाही; यासाठी वाहतूक व्यवस्थापनात सातत्य, उपस्थिती आणि जबाबदारी आवश्यक आहे. पोलिस प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

