(खेड)
शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांना घेऊन येणाऱ्या खासगी आराम बसला खेड तालुक्यात भीषण अपघात झाला. खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे बोरिवलीहून सापिर्ली गावाकडे येणारी बस पलटी झाल्याने २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. आज (शुक्रवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली येथून सापिर्ली व धामणंद परिसरातील भाविक शिमगोत्सव आणि ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गावी येत होते. नेहमीप्रमाणे ही खासगी आराम बस गुरुवारी रात्री बोरिवलीहून निघाली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास बस खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे पोहोचली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली.
बसमध्ये एकूण २८ प्रवासी होते. अपघातानंतर काही प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. मात्र अपघाताचा मोठा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत बसची समोरील काच फोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताच्या वेळी बसमधील बहुतांश प्रवासी झोपेत असल्यामुळे २८ पैकी २५ प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.
सध्या जिल्ह्यात शिमगोत्सवाची धूम असून ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी जात आहेत. त्यामुळे मुंबईसह इतर भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आणि भाविक गावाकडे येत असतात. त्याचदरम्यान हा अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तसेच कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

