(मुंबई)
महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार कालावधी संपत येत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा एक वेगळाच लुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एरव्ही जीन्स आणि शर्टमध्ये दिसणारे चव्हाण गेल्या काही दिवसांपासून थेट लुंगी परिधान करून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यांचा हा पारंपरिक पेहराव सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात याबाबत उत्सुकता वाढली आहे.
राज्यात भाजप आणि शिंदे सेनेच्या महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध ठिकाणी सभा घेत वातावरण निर्मिती केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असले तरी कल्याण-डोंबिवली हा भाग रविंद्र चव्हाण यांचा होम पिच मानला जातो. या परिसरात त्यांनी जाहीर सभा, मेळावे आणि मतदार भेटींचा सपाटा लावला आहे. मात्र, या सगळ्या धावपळीत त्यांच्या बदललेल्या पेहरावाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
रविंद्र चव्हाण यांनी अचानक लुंगी का घातली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, या मागे कोणतेही राजकीय कारण नसून आरोग्याशी संबंधित कारण समोर आले आहे. त्यांच्या गुडघ्याच्या वाटीतील गादीला त्रास होत असल्याने जीन्स पॅन्ट घालणे त्यांना कठीण झाले आहे.
वैद्यकीय कारणामुळे पायाची हालचाल करताना अडचणी येत असल्याने, पायाला आराम मिळावा आणि हालचाल सुलभ व्हावी या उद्देशाने त्यांनी पेहरावात बदल केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते लुंगी परिधान करून मतदारांच्या भेटी घेत आहेत.
या संदर्भात अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, गुडघ्याच्या वाटीतील गादी जास्त प्रमाणात सरकल्यास पाय दुमडणे किंवा घट्ट कपडे घालणे अत्यंत त्रासदायक ठरते. अशा स्थितीत पॅन्ट घालणे शक्य नसते आणि पाय मोकळे ठेवणे गरजेचे असते. याच कारणामुळे रविंद्र चव्हाण यांना लुंगीचा आधार घ्यावा लागला आहे.
स्वतःच्या आरोग्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष करत, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही चव्हाण यांनी याच पेहरावात मतदारांपर्यंत पोहोचत प्रचाराची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे त्यांचा हा साधा पण कारणयुक्त लूक सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
संजय राऊतांचं टीकास्त्र
संजय राऊतांनी यावर टीका करताना म्हटले की, रवींद्र चव्हाण दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसून महायुतीच्या सभेत आले, म्हणे गुडघ्याला मार लागलाय म्हणून लुंगी; मग मोकळा ढाकला मराठी लेंगा घालता आला असता, काय बोलायचं यांना? एवढंच नव्हे तर रवींद्र चव्हाणांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची सडकून टीकाही त्यांनी केली. सत्तेसाठी रवींद्र चव्हाण वेडे झाले आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी अण्णामलाईसह भाजपवर घणाघात केला.

