(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या लातूर येथील पत्रकार परिषदेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या प्रकारानंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसवर तीव्र टीका होऊ लागली होती.
घटनेनंतर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत राजकीय शिस्तीचा भंग मानत चव्हाण यांच्यावर कारवाईचे संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरद्वारे सूरज चव्हाण यांना युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिले.
अखेर, सूरज चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. त्यांनी म्हटले, “सूरज चव्हाण यांनी युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कालच्या घटनेचा मी आधीच निषेध केला होता. राज्यकर्त्यांनी संयमाने प्रसंग हाताळावेत, हीच अपेक्षा आहे.”
तटकरे यांनी यावेळी आणखी सांगितले की, “या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांवर आहे. पक्षशिस्तीच्या दृष्टिकोनातून काय योग्य आहे, हे पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल.”